मद्यधुंद होमगार्डचा भरवस्तीत गोळीबार

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : होमगार्डने मद्यधुंद अवस्थेत भरवस्तीत गोळीबार केल्याचा गंभीर प्रकार शुक्रवारी (दि.२८) भावसिंगपुर्‍यातील निसर्ग कॉलनीत घडली. याबाबत छावणी पोलिसांनी होमगार्डला अटक केली. त्याच्याकडून १२ बोअर बंदूक व काडतुसे जप्त करण्यात आली. प्रसंजीत मनोहर कांबळे (वय ४८, रा. निसर्ग कॉलनी, भावसिंगपुरा) असे गोळीबार करणार्‍या होमगार्डचे नाव आहे.
छावणीचे अंमलदार शफीक युनुस शेख (वय ४१) यांनी तक्रार दिली. त्यानुसार, ११२ बिट मार्शलमार्फत निसर्ग कॉलनी परिसरात फायरींग सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. कांबळे मद्यधुंद अवस्थेत घराच्या ओट्यावर उभा राहून त्याने परवाना असलेल्या १२ बोअर बंदुकीतून गोळीबार केला. चौकशीत त्याने दोन राउंड फायर केल्याचे समोर आले. आरोपी प्रसंजीत याला न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
यापूर्वीही केले फायर
मद्यपी होमगार्डने यापूर्वीही फायर केल्याचा संशय असून, ते १७ राउंड कुठे फायर केले हे शोधण्याचे आवाहन पोलिसांसमोर आहे. त्याच्याकडून फायर केलेले १९ खाली केस, १३ जिवंत काडतुसे असा एकूण १३ हजार ४४० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या प्रकरणात छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.